Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: नीता चंद्रकांत कुलकर्णी
एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255
देवीचा नवरात्रौत्सव आला आला म्हणता म्हणता संपला सुद्धा… दिवस कसे भुर्रकन उडून गेले. किती तयारी आणि गडबड चालली होती… माती आणायची, सप्त धान्य पेरायचं आणि मग ती वर उगवून आलेली हिरवीगार लुसलुशीत पात… त्याचा अलवार स्पर्श… तो सुंदर असा सृजनाचा सोहळा डोळे भरून पाहायचा… घट बसवायचे… कडकण्या करायच्या… रोज एक माळ अर्पण करायची… श्री सूक्ताची सोळा आर्वतनं… सप्तशतीचा पाठ… घागरा घालून केलेला गरबा… भोंडल्याची गाणी म्हणत धरलेला फेर… नंतर खिरापतींची मजा… भजनाचे कार्यक्रम… त्यात गोंधळ, जागरण हवेच… कुंकूम् आर्चन, सवाष्णींच्या ओट्या… कुमारीपूजन… रोज रंगीबेरंगी जरीच्या साड्या, दागिने… बाहेर जाणं… सर्वांना भेटणं, गप्पा… टाळ घेऊन आरत्या म्हणायच्या… घरी गोंधळी बोलवायचा… डफ…
चिंचा विकत असलेल्या एक ताई रस्त्यावर दिसल्या. त्यांना बघून माझे मन एकदम खूप मागे गेले. शाळा डोळ्यासमोर आली… शाळेच्या दारात बसून चिंचा, आवळे विकणाऱ्या मावशी आठवल्या. मैत्रिणींबरोबर शाळेत जाताना किती आनंद असायचा नाही का? त्यावेळी घराजवळ असलेल्या शाळेत प्रवेश घेतला जायचा. पायी पायी मैत्रिणींशी गप्पा मारत रमत गमत शाळेत जायचं. त्यावेळेस गृहपाठ, वर्गपाठाची वही आणि त्या विषयाचं पुस्तक दप्तरात असे. पण त्याचं ‘ओझं’ कधी वाटलं नाही. मीना माझ्याकडे येत असे. तिच्याकडे आवळ्याचे झाड होते. ती खिसा भरून आवळे आणायची. रस्त्याने खात खात जायचं. मग आम्ही दोघी वाट वाकडी करून दयाकडे जात असू… दयाचं घर खूप मोठं होतं. मागेपुढे बाग होती.…
घटस्थापना होऊन देवी आईचा नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. ती देवी कशी आहे? नीट बघा… फुलांनी सजवलेल्या देवघरात तिची स्थापना केलेली आहे. अखंड नंदादीप तेवत आहे. त्याच्या शांत प्रकाशात तिचे रूप न्याहाळून बघा… केसापासून पायाच्या नखांपर्यंत ती सर्वांग सुंदर आहे. नाना अलंकार तिने घातलेले आहेत. कोटी कोटी चंद्राचे तेज तिच्या मुखावर आहे. ती तेजस्वी, प्रफुल्लित आहे. इंद्रनील मण्यासारखी तिची कांती आहे. ती विश्वाची स्वामिनी, जगतजननी आहे. अशी ही देवी सुंदर, कोमल, शांत, समंजस, नाजूक आहे… पण इतकंच तिचं वर्णन आहे का? तर, नाही… ती अष्टभुजा आहे. तिच्या प्रत्येक हातात गदा, चक्र, शंख, धनुष्य बाण, शूल, पाश, खड्ग अशी विविध आयुधं आहेत.…
आपला प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. रोज नवीन प्रश्न समोर उभे राहत असतात. खरंतर, ती आपली एक प्रकारे परीक्षाच असते. मनात सहज विचार आला… मग गंमत म्हणून मी एक प्रयोग करून बघितला. काही दिवस माझ्याच रोजच्या दिवसभराच्या वागण्याचा पेपर रात्री तपासून पाहिला. त्यातले प्रश्न किती वेगवेगळे होते बघा हं… एका वाक्यातली उत्तरं – वरवर साधी, पण कस बघणारी होती. काही प्रश्नांना अगदी कमी शब्दांत एका वाक्यात उत्तर देणं, फार अवघड गेलं. जोड्या लावा – हा प्रश्न सोपा वाटला, पण लावलेल्या जोड्या काही दिवसांनी चुकीच्या ठरल्या. मोठी प्रश्नोत्तरे सविस्तर लिहायची होती. कधी कधी त्यांची उत्तरे बरी आली, कधी थोडक्यात चुकली. तरी…
गौरी-गणपतीचा सण फार आनंदात साजरा केला होता. घरात नुसती गडबड… बाहेर तर धूम चाललेली होती. गणपतीचे विविध देखावे, आरास, लाइटिंग हे बघायला फार मजा येत होती. मित्र, मैत्रिणी, नातेवाईक येऊन गेले. अथर्वशीर्षांची आवर्तनं चालू होती. सगळीकडे विलक्षण उत्साह भरलेला होता. बघता बघता अनंत चतुर्दशी आली… गणपतीच विसर्जन झालं… फुलांच्या माळा, दिवे, चौरंग हे सगळं रात्री आवरून झालं. आज रोजच्या सारखी सकाळी बागेत चालायला गेले. मैत्रिणी आल्याच होत्या. त्यांच्याबरोबर बाकावर बसले. गप्पा सुरू झाल्या… इतक्यात राधा आली आणि म्हणाली, “ए, सारखं गोड खाणं चाललंय… आधी चार चार चकरा मारा आणि मग गप्पा…” तशा सगळ्या म्हणाल्या, “आम्ही नाही येणार… अगं, दमलो आम्ही.…
सोन्या रुप्याच्या पावलांनी गौरी घरात आल्या. प्रत्यक्ष त्या महालक्ष्मींचं आगमन होतं घरी… किती भाग्याची गोष्ट आहे ना! घरातल्या प्रत्येक खोलीत नेऊन त्यांना घर दाखवलं. दोघींना नीट बसवलं. साडी, दागिने हार घातले. आरती, मंत्रपुष्पांजली झाली. आल्या दिवशी साधी भाजी भाकरी… ती दाखवून झाली. दूध देऊन दोघींना आराम करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच लगबग सुरू झाली. पुरणावरणाचा स्वयंपाक, भाजी, कोशिंबीर, भात वरण… दोघींचा चेहरा तृप्त दिसत होता. गौरी प्रसन्न हसतमुख दिसत होत्या. घरात आनंद उत्साह भरला होता. तो दिवस गडबडीत गेला. रात्री निवांत दोघींसमोर बसले… समई तेवत होती. त्या प्रकाशात गौरीचा शांत, आश्वासक चेहरा उजळला होता. मनातलं तिला ओळखता येतंच, तरी सगळं…
गणपती, गौरीच्या आगमनाचे दिवस जवळ आले. नेहमीप्रमाणे त्याची तयारी सुरू केली. माझं काम सुरू होतं. मधे जरा दमल्यासारखं झालं म्हणून बसले… शेजारी कोणीतरी आहे असा भास झाला… बघते तर माझी गौरीमायच समोर दिसली. अगदी माझ्याकडे मुखवटे आहेत तशीच! सर्वांग सुंदर… हसरा चेहरा… अतिशय गोड चेहऱ्याची… शांत नजरेनं बघत होती… मला आश्चर्य वाटले. काही सुचेना. तिच्याकडे बघतच बसले. मधुर आवाजात ती म्हणाली, “ओळखलसं ना मला?” “अगं हो गं… तू अशी… आत्ता अचानक कशी आलीस?” गौरी मायला बघून मला अत्यंत आनंद झाला होता. मात्र तिला असं अकस्मात् समोर बघून मी गडबडून गेले होते. “का आले ते सांगते… ये इथं. बैस शांतपणे माझ्याजवळ.…
घरी गणपती बसवायचं ठरवलं तेव्हाची गोष्ट… कोणाला विचारायला गेलेच नाही. रीतीरिवाज… घराणं… परंपरा… मतं-मतांतरं… चर्चा… हे काही मला नको होतं. माझं मलाच विचारलं, मनाने कौल दिला! प्रत्यक्ष देवाला घरी आणायचं मग भीती कशाची? कुणाची? सुबक सुरेख पितळी मूर्ती घेऊन आले. लहानगी दोन्ही नातवंडं एकदम खूश झाली. त्यांनी आरास केली. बाप्पाची चौरंगावर स्थापना केली. हौसेने सुरेख सजवलं… समई, उदबत्ती, दिवे लावले… फुलं, हारं घातले… पूजा केली… मोदकांचा नैवेद्य दाखवला… टाळ घंटेच्या गजरात आरती झाली… मंत्रपुष्पांजली… अथर्वशीर्षाची आवर्तनं… श्री गणेशाचे ब्रह्मणस्पती सूक्त म्हटलं. सारं काही यथासांग सुरू होतं. घरभर चैतन्य पसरलं होतं. “आमच्याकडे गणपती आहे,” कौतुकाने नातवंडं सांगत होती. आनंदसोहळा सुरू होता.…
सकाळ झाली. रोजच्या सारखे गुरुजी पूजा करण्यासाठी देवळात निघाले. पूर्वी देऊळ साधेसुधे होते. आता भव्य बांधले होते. पायरीला नमस्कार करून गुरुजी आत आले. अजून चार गुरुजी त्यांच्याबरोबर होते. ते पाचजण मिळून पूजा करत असत. चांदीचा भला मोठा दरवाजा उघडला होता. समोरच सोनं, मोती, हिऱ्याच्या दागिन्यांनी सजलेली देवाची मूर्ती होती. नमस्कार करून त्यांनी पूजा सुरू केली. प्रथम काळजीपूर्वक एकेक दागिना काढायला सुरुवात केली. दुसरे गुरुजी, ते दागिने पेटीत ठेवायला लागले. प्रत्येक वाराचे दागिने वेगळे होते. शुद्ध पाण्याने देवाचे स्नान झाले. चांदीच्या पाच भांड्यात पंचामृत होते. ते घातले. नंतर कोमट पाण्याने देवाला स्नान घातले. पंचाने देवाला पुसले. पितांबर नेसवला. अंगरखा घातला. शेला…
परंपरेने चालत आलेलं स्तोत्र, मंत्र, आरत्या, पूजा हे सगळं तिला फार आवडायचं. ती मनोभावे ते करायची. पुढच्या पिढीचा मात्र तिला मनातून फार राग होता… यांना काही सांगायची सोय नाही. प्रत्येक गोष्टीचं कारण विचारायचं… ‘हे का?’ आणि ‘ते का?’… जाऊ दे… पण आपलं आपण तरी करायचं, हे तिने ठरवलं होतं. आज श्रावणी सोमवार होता. तिची पूजा आरती झाली. कहाणी वाचून झाली. फराळ करायच्या आधी तिला देवदर्शन करायचे होते. म्हणून ती शंकराच्या देवळात जायला निघाली. निघताना नवऱ्याने, घरच्यांनी तिला जरा टोकलंच… पण त्यांचं न ऐकता ती निघाली. मैत्रिणीला तरी विचारावे म्हणून ती पलीकडे राहणाऱ्या मैत्रिणीकडे गेली. मैत्रिणीने दार उघडले. ती गडबडीत होती……

